तोडाफोडीचे राजकारण महाराष्ट्रत लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या अंगलट येणार? मराठा आरक्षण, धनगर आरक्षणही ठरणार कळीचे मुद्दे ,ओबीसीही नाराज

 तोडाफोडीचे राजकारण महाराष्ट्रत लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या अंगलट येणार?

मराठा आरक्षण, धनगर आरक्षणही ठरणार कळीचे मुद्दे ,ओबीसीही नाराज 

परळी (रानबा गायकवाड )  महाराष्ट्रात काहीही करून पुन्हा सत्ता हस्तगत करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने तोडफोडीचे जे राजकारण केले होते . आणि राज्यात सरकार स्थापन केले होते.ते आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या अंगलट येणार असे चित्र स्पष्ट दिसत आहे .त्यातच मराठा आरक्षण ,धनगर आरक्षण ,आणि नाराज झालेला ओबीसी प्रवर्ग यामुळे भाजपाचे किती उमेदवार निवडून येतील हे सांगणे कठीण आहे.
    माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्यासाठी शिवसेनेचे एकनाथ शिंदे व त्यांच्यासह 50 आमदारांना फोडून भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात सरकार स्थापन केले .यामध्ये एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली .मंत्रिमंडळामध्ये शिंदे गटाच्या अनेक आमदारांना मंत्री पदाचे आश्वासन दिले होते .अनेक आमदार आपण मंत्री होणार याची वाट पाहत होते .परंतु अखेरपर्यंत अनेकांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली.दिली तर शिंदे फडणवीस यांनी अनेकांना अद्याप पर्यंत झुलवत ठेवले आहे.उलट अजित दादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड करून शिंदे सरकारला पाठिंबा दिला.तेंव्हा त्यांच्या गटातील अनेकांना मंत्रिप
दं मिळाली.
     शिवसेना पक्ष फोडून एकनाथराव शिंदे यांच्या कडे  शिवसेना धनुष्यबाण चिन्हासह गेली. तीच परिस्थिती खासदार शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची झाली .अजितदादा पवार यांनी 40 आमदारांचे बंड करून शिंदे गटाप्रमाणेच मूळ राष्ट्रवादीवर आणि घड्याळ चिन्हावर दावा केला आणि त्यांच्या दाव्याप्रमाणे मूळ राष्ट्रवादी त्यांच्याच वाट्याला आली . पक्ष फोडाफोडीचे आणि आमदार खासदारांच्या मागे ईडी ,सीबीआय , आदी संस्था लावून त्यांना भाजपात घेणे यामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे . भाजपानेच भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या इतर पक्षातील अनेक आमदारांना आणि खासदारांना भाजपाने आपल्या पक्षात घेतले.महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिक या राजकारणाला वैतागला असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे भ्रष्ट आणि भाजपात प्रवेश केला की स्वच्छ असे कसे होऊ शकते असे जनतेतून बोलले जात आहे.
    दुसरीकडे ओबीसीतूनच मराठा आरक्षण मिळावे यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या सहा महिन्यापासून तीव्र आंदोलन चालू केले आहे .संपूर्ण महाराष्ट्रात लाखोंच्या सभा आणि मोर्चे मराठा समाजाच्या वतीने काढण्यात आले .एवढेच नाही तर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मुंबईत जाऊन उपोषण करण्याचा निर्धार मनोज जरांगे यांनी केला होता .त्यावेळेला नवी मुंबईत लाखो मराठे पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिष्टाई करून त्यावेळेस मुंबईतील उपोषण रोखण्यात यश मिळवले होते.
   थोड्याच दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महाराष्ट्र सरकारने आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाची घोषणा केली.महाराष्ट्रात मराठा समाजातील ज्यांचे कुणबी पुरावे सापडले आहेत अशा मराठ्यांना ओबीसी जातीचे प्रमाणपत्र देण्यात आले.याचा ओबीसी नेते आणि ओबीसी समाजाने तीव्र विरोध केला.आणि सरकारने मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये अशी मागणी केली. ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी अनेक ओबीसी एल्गार सभा घेऊन सरकारचा निषेध केला आहे.
     धनगर आरक्षणाच्या बाबतीतही राज्य सरकारने असेच खोटे आश्वासन देऊन आपली फसवणूक केल्याची भावना धनगर समाजात निर्माण झाली आहे.त्यामुळे काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपा व त्यांचे मित्र पक्ष असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने