हाताने मरण ओढवून घेऊ नका
गेल्या दोन दिवसांत मी दोन घटना पाहिल्या. एक उड्डाणपुलावर तर दुसरी बाळकृष्ण रोडे चौकातील. दोन्ही घटनेत सहभागी असणारे वयाने तरुण. वीसी पंचवीसीतले. कुणाचे तरी लाडके मुले. पण त्यांची कृत्ये ( कामगिरी ) पाहिल्यानंतर आई, वडिलांची मान शरमेने खाली घालायला लावणारी अशीच होती.
पहिल्या घटनेत मी परळीचे माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अयुबखाॅ पठाण यांच्या समवेत त्यांच्या गाडीत एका कार्यक्रमाला सिरसाळा येथे जात होतो. सायंकाळचे सात वाजले होते. गाडी उड्डाणपूलावरून सिरसाळ्याच्या दिशेने निघाली. उड्डाणपूलावर सहाजिकच दोन्ही बाजूने वाहनांची वर्दळ होती. याच दरम्यान आमच्या गाडीच्या मागून एक मोटारसायकल आली. त्यावर चौघे तरुण बसलेले होते. आणि ते ओरडत होते. त्यामुळे आमचीही नजर त्यांच्याकडे गेली. चौघेही तरणेबांड. वीस, पंचवीशीच्या आतले. तीन नंबरवर बसलेल्याने मागे बसलेल्या तरुणाला हात मागे करुन तो पडू नये म्हणून आवळून धरले होते.
त्यांच्या आरडाओरड व हावभाव ,आणि गाडीवर बसण्यावरूनच आम्ही ओळखले यांनी दारू ढोसलेली आहे. आणि ती जास्त झाली आहे. पण रस्त्यावर वाहन चालवताना ते सुरक्षितपणे चालवावे लागते. म्हणतात ना ' नजर हटी, दुर्घटना घटी! त्यांची अवस्था पाहून आम्हाला भिती वाटत होती हे सुरक्षित घरी जातात की कुठे अपघात होतो. गाडी इटके काॅर्नरला आली. तिथे चौकात गंगाखेड कडून एक बारा टायर वाहन येत होते. इतर वाहनांची गर्दी होती. मोटरसायकल चालविणाराने त्या गाडी समोर गाडी थांबवली. आमची गाडी सिरसाळाकडे वळली.
दुसरी घटना रोडे चौक, हॉटेल दिपाली समोरील. दुपारी चारच्या सुमारास एक अंदाजे तीस वर्षाचा तरुण. फुल्ल दारू पिऊन बेहोश झालेला. त्याच्या अंगावरील मळलेल्या कपड्यावरून लक्षात आले की हा सतरा ठिकाणी लोळण घेत आला आहे. त्याला घराकडे जायचंय पण नीट चालता येत नाही. उभाही राहू शकत नाही. मी हाॅटेल दिपाली च्या बाहेर बाकड्यावर बसलो होतो. तो अति मद्य प्राशन करणारा तरुण चौकात असणाऱ्या हायमास्क दिव्याच्या खंब्या
ला चिकटून पडला होता.
ला चिकटून पडला होता.
पायातील चपला विखुरलेल्या. त्याला पायात चप्पल घालून घराकडे जायचे होते. हायमास्क पोलची वायरिंग उघडी होती. तो उठवण्यासाठी त्या पोलचा आधार घेत होता. पण आपला हात कुठं चाललाय. आपणाला करंट लागेल. आपल्या जिवाचं काही बरं वाईट होईल याचे त्याला भान नव्हते. तो त्या पोलच्या वायरिंगमध्ये हात घालत होता. या नादात दोनदा तो पुन्हा तिथेच खाली आडवा झाला.
याच वेळी सामाजिक कार्यकर्ते महेंद्र रोडे, राहूल घोबाळे, प्रदीप भोकरे तिथे आले. अशा अवस्थेत त्याच्या जिवाला धोका होऊ शकतो हे ओळखून प्रदीप भोकरे, राहूल घोबाळे यांनी त्याला अॅटोत उचलून टाकले. प्रदीप भोकरे यांनी त्याला त्याच्या पदमावतीतील घरी नेऊन सोडले. महेंद्र रोडे, प्रदीप भोकरे, राहूल घोबाळे यांचे हे कार्य निश्चित कौतुकास्पद आहे. अभिनंदनीयआहे.
या दोन्ही घटनेतील तरुणांना पाहिल्यानंतर असे वाटत होते की हे हाताने मरण मागत आहेत की काय? दारू पिऊन बेधुंद अवस्थेत रस्त्यावर वाहन चालवणे अतिशय धोकादायक आहे. जिथे मेंदूच जेंव्हा बेशुद्ध होतो तेंव्हा त्या व्यक्तीचे वाहन चालवताना किती नियंत्रण असणार आहे. अशा लोकांना मरणमागे म्हणावे नाय तर काय?
रानबा गायकवाड
टिप्पणी पोस्ट करा