आगामी विधानसभेच्या सर्वच इच्छुक उमेदवारांनी दिला भयमुक्त परळीचा नारा

आगामी  विधानसभेच्या सर्वच इच्छुक उमेदवारांनी दिला भयमुक्त परळीचा नारा 

परळी प्रतिनिधी.          महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूक 2024 थोड्याच दिवसावर येऊन ठेपलेल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या  नेत्यांनी नुकत्याच पत्रकार परिषदा घेतल्या. आणि या पत्रकार परिषदेमधून आपण भयमुक्त परळी ,दहशतमुक्त परळी निर्माण करण्यासाठी निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले. सर्वच इच्छुक उमेदवारांच्या भूमिकेत साम्य दिसून येत आहे. त्यामुळे खरंच हा परळीचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे का अशी चर्चा जनतेतून होताना दिसत आहे. 
    नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या. आणि आता संपूर्ण महाराष्ट्राला विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला लागलेले दिसून येत आहेत. राजकीय पक्षांच्या बैठका, मेळावे, यात्रा पदयात्रा, संवाद यात्रा ,सभा,आता सुरू होताना
दिसत आहेत. राजकीय पक्ष प्रत्येक विधानसभा मतदारसंघात कोणता उमेदवार द्यायचा याच्या तयारीला लागलेले दिसून येत आहेत. 
    परळी विधानसभा मतदार संघातून विद्यमान महाराष्ट्राचे कृषिमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे हे नेतृत्व करीत आहेत. परळी नगरपरिषद, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती आदी प्रमुख संस्था ना. धनंजय मुंडे यांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघात ना. धनंजय मुंडे यांचे निर्विवाद वर्चस्व आहे. 
   दुसरीकडे आगामी परळी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुदामतीताई गुट्टे यांनी सर्वात प्रथम पत्रकार परिषद घेतली आणि परळी विधानसभा मतदारसंघातून भयमुक्त परळी, दहशतमुक्त परळी आणि परळी शहरातील गुंडागर्दी कमी करणे आणि सर्वसामान्यांच्या विकासासाठी आपण निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले. पक्षाचे अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांनी संधी दिल्यास पूर्ण ताकतीने विधानसभा लढवून असेही त्या म्हणाल्या. 
   त्यानंतर रासपाचे युवक प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ फड यांनी पत्रकार परिषद घेतली .आणि त्यांच्याही पत्रकार परिषदेतून त्यांनी भयमुक्त परळी, दहशतमुक्त परळी आणि  सामान्य नागरिकांच्या विकासासाठी आपण निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले. याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांनी नुकतीच भेट घेतली आहे. या दोन नेत्यांच्या पत्रकार परिषदेनंतर काल दिनांक 23 जुलै रोजी काँग्रेसचे बीड जिल्हा अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी परळीत पत्रकार परिषद घेतली. 
    काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतूनही मी भयमुक्त परळी, दहशतमुक्त परळी ते नागरिकांना सुख, समाधान, आणि शांतीने जगता यावे, त्याचबरोबर परळीतील विविध विकास प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नावर काम करण्यासाठी निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले. याबरोबरच महाविकास आघाडी ज्या पक्षाला तिकीट देईल त्यांचे काम करू असे हे सांगितले. 
   एकंदरीत आतापर्यंत आगामी परळी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी लागलेल्या सर्वच नेत्यांच्या पत्रकार परिषदेमधून भयमुक्त आणि दहशतमुक्त परळी हा प्रमुख मुद्दा असल्याचे दिसून येत आहे. परळीतील सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, नोकरदार खरोखरच दहशतीखाली जगत आहे का? तो कोणाच्या भीतीखाली जगत आहे का?, हा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने