पेन ,पुस्तक आणि वर्तमानपत्र

पेन ,पुस्तक आणि वर्तमानपत्र 

         पेन आणि वर्तमानपत्र दोन्हींचा तसा खूप जवळचा संबंध आहे. जगात बहुतेक ज्याच्या हातात पेन आला त्याच्या हातात वर्तमानपत्र पडायलाच पाहिजे. पण तसे सर्वांच्या बाबतीत होत नाही. अनेक वेळा ज्याच्या हाती पेन असतो तो जेवढे काम तेवढेच करतो. पुन्हा पेनाला पुस्तके अथवा वर्तमानपञांकडे घेऊन जात नाही. कदाचित त्याला जास्त ज्ञानाची गरज नसावी. 
       माझ्या लहानपणी मी शाळेत गेलो तेंव्हा माझ्या वडिलांनी मला दगडी पाटी आणि पेन्सिल घेऊन दिली होती. सरांनी मला पहिले अक्षर शिकविले, ते गिरवायला लावले, आणि मी पहिले अक्षर शिकलो ती दगडी पाटीच होती. अक्षरे काढायची, पाढे लिहायचे, चुकले की पुन्हा पुसायचे आणि पुन्हा लिहायचे. सरांना दाखवायचे. जो पर्यंत बरोबर येत नाहीत तोपर्यंत. नाहीतर छडीचा मार ठरलेलाच. 
     खर तर ही दगडी पाटी पुढे सातवी आठवी पर्यंत वापरली. पेन तसा हातात दुसरीच्या वर्गात आला. पहिलिला पेनाची गरजच पडली नाही. पण आयुष्यात पुढे पेन चालवण्याची सारी तयारी पाटीवरच झाली होती. बाराखडी, पाढे, गणित ही पाटीनच शिकविली आणि पेनाने ती पुढे नेली. खर तर दगडी पाटीनेच माझ्या शिक्षणाचा पाया मजबूत केला. 
       परळी, सांगली, सातारा, मुंबई आणि पुन्हा परळी, अंबाजोगाई आणि परभणी असा माझा शिक्षण प्रवास झाला आहे. लहानपणी एका घटनेने मला शिक्षणासाठी फिरवले. ती घटना कुणाच्याही आयुष्यात घडु नये. आई वडीलांपासून दूर राहण्याची वेळ कुणावर येऊ नये. पण मी जिथेही शिक्षण घेतले तिथे माझ्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावत गेल्या. शरीराच्या वजनाने नाही वाढू शकलो. पण बुद्धीचे वजन मात्र निश्चित वाढले. 
   सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत आणि छञपती शाहू बोर्डिंग मध्येच मला अभ्यासाची व पेपर वाचनाची आवड निर्माण झाली. छंद जडला तो आजतागायत कायम आहे. आता तर पञकारिता हा माझा व्यवसाय आहे. त्यामुळे पेन आणि पेपर  ( वर्तमानपत्र ) यांचे अतुट नातेच जुळले आहे. या नात्यातूनच चार पुस्तके, पाच नाटके आणि पाच लघुपटांचे लेखन आणि निर्मिती झाली. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यात काम करण्याची संधी मिळाली ती पेन, पुस्तके आणि पेपरमुळेच.
     पेन, पुस्तक आणि पेपरमुळे गावात, परिसरात, तालुक्यात ,जिल्ह्यात आणि राज्यात ओळख झाली. सुजान वाचक, साहित्यिक, कार्यकर्ते ,शिक्षक, प्राध्यापक आदी मित्रपरिवार जोडला गेला. पेपर आला की बातमी आली. आणि बातमी करायची म्हटली की ती लिहावी लागते. आज काॅपी पेस्ट पञकारिता वाढली आहे. आलेली बातमी जशीच्या तशी फॉरवर्ड करणे किंवा संपादकांना पाठवणे म्हणजे पञकारिता नव्हे. तशी पञकारिता मला जमली नाही आणि जमणार सुध्दा नाही. मी जे पाहतो, अनुभवतो ते लिहतो. ते लिहिल्याशिवाय मनाला समाधान मिळत नाही. आज अनेक पञकार मी असे पाहत आहे ते पञकार तर आहेत पण खिशाला पेन नसतो. 
     मानले आजचे युग हे आधुनिक युग आहे. नव्या टेक्नॉलॉजीचे जग आहे. कॉम्प्युटर पासून हातात असणारे स्मार्ट फोन आले. त्याला जोडून अनेक नव्या गोष्टी आल्या. राजकीय नेत्यांच्या बातम्या तर त्यांच्या पीए मार्फत तयार होऊनच येतात याचा अर्थ पेनाची गरज नाही असा होत नाही. मला वाटते पञकारिता ही पेन आणि पुस्तकाशिवाय परिपूर्ण होऊच शकत नाही. तसे खिशात कार्ड असले म्हणजे आम्हाला पञकार असल्याचे समाधान आणि मोठेपणा वाटतो. 
       बँकेत, पोस्टात, तहसील, नगरपालिका, पंचायत समिती,रेल्वे,  दवाखाना आदी कार्यालयात गेलो की अनेक माणसे भेटतात. तिथे त्यांना पेनाची गरज पडते." पेन बघू द्या हो जरा."आता आपण असतो आपल्या कामात. पेनाशिवाय आपलेही काम होत नसते. मग आपलं काम करून त्या व्यक्तीला पेन द्यायचा. बर जी व्यक्ती पेन घेते ती लगेच परत देईल याची ग्यारंटी नसते. एकाकडून दुसर्‍याकडे, दुसर्‍या कडून तिसऱ्याकडे. आणि पुन्हा गर्दीतून ती व्यक्तीही गायब आणि पेनही गायब. पेनाची किंमत तशी जास्त नाही पण
वेळेला त्याची किंमत कळते. 
       पेन काही तरी लिहिण्यासाठी मागणे आणि आपली नजर इकडे तिकडे जाऊस्तर. किंवा आपण काही पेन दिल्यानंतर दुसर्‍या कामात व्यस्त असताना पेनासह व्यक्ती अदृश्य झाल्याचा अनेक वेळचा अनुभव लक्षात घेतल्यानंतर आता कुणी पेन मागितला तर पेनाचे टोपन काढून माझ्याकडे घेत असतो. आणि पेन त्या व्यक्तीला देत असतो. त्यामुळे निदान आपला पेन जाणार नाही याची शाश्वती तरी मिळते. 
         पेपरच्या बाबतीत तर काय सांगावे. एक तर पैसे देऊन पेपर विकत घेऊन वाचणारांची संख्या कमी झाली आहे. फुकटे वाचक वाढले आहेत. बस स्टँडवर बसची वाट बघत बसाव आणि आपल्या हातात पेपर असावा. किंवा आपण पेपर विकत घ्यावा. आपल्या अगोदर बाजूला उभा असणारी व्यक्ती म्हणते, "बघू द्या हो पेपर "असे म्हणत आपण द्यायच्या आधी आपल्या हातातून पेपर घेणार आणि वाचणार. जणू पेपर आपण नाही त्यानेच विकत घेतला आहे. 
      त्याचे झाले की पुन्हा आपल्या हातात पेपर टेकवणार आणि निघून जाणार. धन्यवाद वगैरे त्यांच्या शब्दकोशात नसते. पेपर घेऊन बस मध्ये बसताच पुन्हा तोच अनुभव येतो. सीटच्या बाजूची व्यक्ती किंवा मागच्या सीटवर बसलेली व्यक्ती एक तर सगळा पेपर घेणार नाही तर एक पान दाखवा म्हणत एक पान घेतले की अशी बाकीची पानेही जाणार. मग त्यांचं जेंव्हा होईल तेंव्हा आपण सगळे पाने एकञ करून पेपर वाचायचा. पञकारांना तर अशा फुकट्या वाचकांचा भरपूर अनुभव असतो. एकदा परळीतील पञकारांनी अशा फुकट्या वाचकांवर बातमीच काढली होती. कुणाचेही नाव न घेता. पण तरीही काहींना वाटले ही बातमी आमच्यावरच लिहिली आहे. मग काय सगळा गदारोळ. मॅटर पोलीस स्टेशनपर्यत.  पण पञकारांनी अचूक निशाना साधला होता. 
          मी राहतो त्या माझ्या अवती भवती मी पञकार आहे हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे माझ्याकडे पेपर असतात हेही त्यांना माहित. पण पेपर वाचण्यासाठी सहसा कुणी मागत नाही. आता तो आवडी निवडीचा, छंदाचा भाग आहे. टिव्हीवर येणाऱ्या बातम्या बघितल्या की साऱ्या बातम्या समजल्या असेही वाटत असावे. नाही तरी मालिका, सिनेमे यातून बातम्या बघणारेही तसे कमीच आहेत. मग पेपर घरी घेणारे किती असणार. पेपरचे किती महत्व असते, पेपरमधून काय मिळतो. पेपर वाचून आपला काय फायदा या नफा तोट्याच्या व्यवहारात पेपरपासून अनेक जण कोसो दूर असतात. 
       मला लोक पेपर मागतात ती वाचण्यासाठी नाही तर भाकरी, चपाती गुंडाळण्यासाठी. नाही तर डबा घेऊन जाण्यासाठी. बर मोठी माणसं हुशार ते पाठवणार लेकराला. "एक पेपर सांगितलाय " मला माहित असते पेपर कशाला पाहिजे तरी मी त्या लेकराकडून जाणून घेण्यासाठी विचारतो. "कशासाठी पाहिजे पेपर "उत्तर येते "डब्बा न्यायचाय. "मी माझ्याकडे घरात असणारा पेपरचे कधी एक पान, कधी कधी दोन जोड पान देऊन टाकतो. लेकरू तो पेपर घेऊन जातं. 
       स्वतःशी पुटपुटतो, "किमान भाकरी, चपाती बांधण्यासाठी तरी लोक मी पञकार आहे. माझ्याकडे पेपर असतो. याची आठवण करतात. पण मला हे अपेक्षित नाही. मला मनोमन वाटत असते. या लेकरांच्या हाती दररोज सकाळी सकाळी एक वर्तमानपत्र वाचण्यासाठी हाती पडावे. त्यांच्या हाती पुस्तके पडावीत. मोबाईल मध्ये जास्त वेळ वाया न घालवता मुलांनी पेपरात आणि पुस्तकात रमावे. आणि आपल्या पाल्याच्या भल्यासाठी ही पालकांची जबाबदारी आहे. 

                रानबा गायकवाड 
                9420148538

2 टिप्पण्या

  1. वाहवा! पेनचं महत्व आणि पेपरवाचन यांची बालपणापासून सांगड घालून अगदी छान विषयाला हात घातला आहे आणि फुकट्या वाचकांचा आणि पेनच्या याचकांचाही खूप छान समाचार घेतला आहे सरजी!अभिनंदन

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने